शुक्रवार, १३ एप्रिल, २००७

होय! वसंत येतोय...

आज office मधून येताना, एक छान संध्याकाळ पहायला मिळाली. रस्ता जुनाच होता आणि प्रवासदेखील routine होता. येताना आजूबाजूची झाडं पाहत होतो.

वाटेत अनेक झाडे होती. काही सदाहरित - तर काही रुक्ष. हिवाळादेखील नुकताच संपल्यामुळे दिवस मोठा होत होता. माझ्या लक्षात आलं की, काही सुकलेल्या झाडांना लाल रंगाची पालवी फुटली होती - अगदी नुकतीच. लाल रंगात स्पंज बुडवून शुभ्र कागदावर ठेवला की, जसा पोत तयार होतो, अगदी तस्साच. काही दिवसांपूर्वी या झाडांवरचं पान अन पान झडून गेलं होतं. अगदीच उदास वाटत होतं ते; पण निसर्ग कसा बिलंदर असतो पहा! त्या रुक्ष झाडांना त्याने हिरव्या नव्हे, तर रंगबेरंगी पाना-फुलांचा उपहार दिला होता.
हिवाळ्यात पाईन वृक्षाकडे पाहून, त्यांच्या ever green पानांचा मत्सर झाला नसेल का त्यांना? किंवा कोणाच्या दारामध्ये आपण सर्वप्रथम का उभे आहोत असा प्रश्न पडला नसेल का त्यांना? पण याची उत्तरं वसंताने दिली. त्या पालवीने फुलणा-या झाडांना पाहून मला खूप प्रसन्न वाटलं आणि त्यांची सोशीकता पाहून मला पप्पांची आठवण झाली.

माझ्याएवढंच वय असेल त्यांचं, किंवा त्याहूनही कमी, जेव्हा त्यांना एकट्याने निष्ठूर जगाला सामोरं जावं लागलं. काही चांगले - व खूप वाईट अनुभव सहन केले त्यांनी. हेच त्यांच्या गंभीरपणाचं कारण असावं बहुतेक. लहानपणापासून पाहत आहे त्यांना, पण व्यक्त करता आलं नाही, का कोणास ठाऊक! आयुष्याचे अनेक प्रखर अनुभव घेवून रुक्ष झाडाप्रमाणे झाले होते. प्रत्येक पावलागणिक तडजोड, संसारयातना. कित्ती कित्ती गोष्टी सहन केल्यात त्यांनी. पण या प्रवासात आईने त्यांना छान साथ दिली.

पण आता परिस्थिती बदलतेय. बहर येतोय.. हो, बहर येतोय. मी त्या झाडाची पालवी बनलोय याहून मोठ्ठं सुख कोणतंच नाही. वसंताची चाहूल लागतेय आणि मला माझ्या झाडाला पूर्ण बहरलेलं पहायचंय. अगणित डोळ्यांनी त्या झाडाला पाहिल्यावर शील, सात्विकता आणि सहनशीलतेची शिकवण घ्यावी. आज पप्पांच्या वाढदिवशी त्यांना आजन्म वसंत लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना..!

रविवार, १ एप्रिल, २००७

शिकवण

खुप दिवसांपासून वाटत होतं,काही तरी लिहावसं; पण काय सुचत नव्हतं. आणि कवितेनंतर तर सगळ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असतील (?) अशी धारणा होती. पण खरं सांगायचं झालं, तर work load मुळे विचारांना सुद्धा विचार सुचत नव्हते. कामाच्या वाढत्या व्यापामुळे आणि tension मुळे कधीतरी मी खचून गेलो. सर्वसामान्य माणसाप्रमाणे देवाला आणि नशीबाला दोष देऊन मोकळा होत होतो. अशा वेळेला एक प्रसंग आठवला.

IIT मध्ये engineering करायचं माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं नाही याचं खूप वाईट वाटायचं. या गोष्टीला खूप दिवस झाले होते. आणि माझं new mumbai ला college सुरु झालं होतं. college नुकतंच सुरु झालं असल्यामुळे IIT च्या ambitions पुर्ण झाल्या नाहित याची खंत मनात अजून होती. त्यात भरीस भर म्हणजे मी एकदा ५२३ ने college ला जात होतो. नेहमीप्रमाणे बस भरली असल्यामुळे मला ऊभं राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. समोरच्या seat वर बसलेला मुलगा, Feynman-lectures on physics चं पुस्तक वाचत होता. त्याच्या bag वरच्या symbol मुळे तो IITian आहे, हे लक्षात आलं. आणि मी परत देवाला दोष देणं सुरु केलं. अगदी मला bus मध्ये seat मिळत नाही, इथपासून ते मला IIT का मिळालं नाही इथपर्यंत!

संपुर्ण प्रवासभर मी - देवाने मला सबंध आयुष्यात काही दिलं नाही, याचा जप करत होतो. तेवढ्यात एक चमत्कार - नव्हे साक्षात्कार झाला..

Hellen Keller Institute पाशी बस थांबली. महापे चा stop आल्यावर बरीच माणसं उतरु लागली. त्या गर्दिमध्ये एक अपंग मुलगी आपल्या आईसोबत उतरत होती. तीला पाहून मी थक्क झालो. ती आंधळी, मुकी होती. तीला धड चालतादेखील येत नव्हतं. ती आणि तीची आई उतरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते....

ज्या देवाने मला काही दिलं नाही, त्या देवाच्या मूक उत्तराला पाहुन मी गहिवरलो. त्या मुलीसोबत माझी तुलना केली, तर मी तिच्यापेक्षा हजारपटीने धडधाकट होतो. देवाने मला किती दिलं नाही, यापेक्षा मला कितीतरी गोष्टी दिल्या आहेत हे एका क्षणात जाणवलं.

तेव्हापासून मी ठरवलं. देवाने आपल्याला खूप काही दिलंय याची जाणीव नेहमी मनात ठेवायची आणि प्रत्येक वेळी, देवासमोर हात जोडल्यावर ईतरांसाठी प्रार्थना करायची. आपल्यावर ओढवलेला प्रसंग हा कितीही वाईट असला, तर त्यात देवाला किंवा दैवाला दोष देण्यात काही अर्थ नसतो.

हा प्रसंग म्हणजे देवाने मला दिलेली सर्वात मोठी शिकवण आहे...!