मंगळवार, २ जुलै, २०१३

गोष्ट एका ताऱ्याची

एकदा एक तारा देवाकडे आपले मागणे मांडायला गेला. "देवा, मला माझ्या आयुष्याचा कंटाळा आलाय. मला माझ्या कामाबद्दल समाधान नाही वाटत आहे."

देव म्हणाला, "अरे, काय झालं? एवढं चांगलं तर चाललंय तुझं. लहान मुलं तुला पाहून खुश होतात. काही जण तुला तासान तास पाहत असतात. पृथ्वीवरच्या लोकांसारखं काही दु:ख नाही. मग तुला चिंता कसली ?"

"दु:खं नसतं तर मी तुझ्याकडे आलोच नसतो - त्रास द्यायला." तारा म्हणाला. "मी रात्री अंधारात प्रकाश देतो. खूप प्रयत्न करतो कि माझ्यामुळे संपूर्ण आकाशातला अंधार दूर व्हवा. पण तसं कधी होत नाही. बिचारा चंद्र थोडा फार प्रकाश देतो, पण त्याचा आकार छोटा होत जातो. एक दिवस तर चक्क गायबच होतो. आजू-बाजूला असलेल्या अंधाराचा नाश व्हावा म्हणून मी कितीही प्रकाश दिला तरी तेच होते. अंधार काही संपत नाही "

"बरं, एवढे करून कोणी माझ्याकडे ढुंकून देखील पाहत नाही. उपास असो किंवा पूजा लोक फक्त चंद्राची पूजा करतात. 'चंद्र वर्षे अमृतास', 'चंद्रापारीस शीतल' अशा उपमा देतात. किती हा दुजाभाव! आणि एवढे असून देखील तू म्हणतोस कि चांगलं चाललाय माझं.

तू तर सर्वेश्वर! सगळ्या कार्यकारणभाव, सर्जनतेचा स्त्रोत तु. कर्म देखील तू आणि कर्ता देखील तूच. एवढे असून देखील अकर्ता असलेला परमेश्वर तूच आहेस. तू सर्व शक्तिमान आणि क्षुष्म तूच आहेस."

"अरे, पुरे पुरे. किती बोलशील! मला तरी बोलू दे." देव उत्तरला.

"नाही, मला याचे दु:ख नाही, कि लोक चंद्राची पूजा करतात आणि माझी करत नाहीत. असा गैरसमज नको करून घेउस. रात्री होणाऱ्या अंध:काराने लहान मुलंच काय पण मोठेसुद्धा घाबरतात. वाईट वाटतं पाहून. प्रकाश आहे, तेज आहे पण त्याने आकाश उजळू शकत नाही किंबहुना मला दिलेल्या कर्माची पूर्तता करू शकत नाही याचं शल्य वाटतं मला. आता सांग, असं वाटणं चुकीचं नाही का?"


देव म्हणाला, "प्रश्न फारच गंभीर आहे बुवा." त्याच्या चेहऱ्यावरचा तो मिश्किलपणा क्षणात गंभीर झाला. देव म्हणाला, "अरे बाळ, अंधार-प्रकाश आनंद-दु:ख या सगळ्या तुलनात्मक गोष्टी आहेत. प्रकाशाचे महत्व अंधाराशिवाय आणि सुखाचे महत्व दु:खाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
तू तुझ्या कर्तव्यात कमी पडतोस हा तुझा न्यूनगंड आहे. तू एक तारा आहेस. आकाशात तुझा प्रकाश कमी जरी भासला तरी तू स्वयंप्रकाशित आहेस. आणि हो, तुझा प्रकाश चंद्रापेक्षा कमी असणं हासुद्धा एक तुलनात्मक भाग झाला."


तारा निमुटपणे ऐकू लागला. साक्षात परमेश्वर आपली समजूत घालतोय आणि पटवून देतोय याच्या निरुपम अद्वैत आनंदाने तो भारावून गेला होता.



"तुझा प्रकाश जास्त असून देखील कमी भासणं आणि चंद्राचा आकार छोटा होत जाणं हा पण एक तुलनेचाच भाग आहे."

"तुझ्या कामाच्या बाबतीत तू चोख आहेस. तुझ्या कडे कोणी पाहत नाही, असा गैरसमज करून घेऊ नकोस. प्रवासी दिशा पाहण्यासाठी तुझ्याचकडे पाहतात. तुझ्यावरूनच लोक पावसाचा अंदाज बांधतात. तुझा प्रकाश हा कोणाशी बांधील नाही. तेजाच्या अंशाचा स्त्रोत तूच आहेस, बरोबर?"

ताऱ्याने मान डोलावली.


"प्रकाश देणे हे तुझे कर्म आहे आणि हे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे. शेजारी असलेला सगळा अंधार तू दूर करू शकत नसलास तरी नित्य तेजस्वी राहण्याचं काम तू करतो आहेस. लक्षात ठेव, या अंधारामुळे तुझे अस्तित्व आणि तुझ्यामुळे आकाशाचे सौंदर्य आहे. अंधार आहे म्हणून दिवसाचे महत्व टिकून आहे. कर्म अविरत असण्याचा महान संदेश चंद्र सुर्य आणि तुझ्यासारखे तारे सर्वत्र पोहोचवतात."


"तुलाच नव्हे, तर सगळ्या चराचराला माझे सांगणे आहे कि तुमचे अस्तित्व एका महत्वाच्या कार्यासाठी आहे. सगळ्या कामाची पूर्तता आपण एकटे करू हा विचारच चुकीचा आहे. शेजारी असलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर नसल्या, तरी तुझ्या परीने कर्तव्याला अनुसरून वागणे तुला भाग आहे. त्याहून दुसरे श्रेष्ठ काही नाही. तू जसे म्हणालास, या सर्व गोष्टींचे अस्तित्व माझ्यामुळेच आहे. तुझ्या कर्माचे कारण, कृत्य आणि फलित देखील मीच आहे. सर्व चरचर हे केवळ एक माध्यम आहे. एखादे कार्य माझ्यामुळे झाले किंवा चूक/बरोबर झाले हा विचारच हास्यास्पद आहे; परंतु सर्वांमध्ये असलेला हा भ्रम आहे."

"तुझे अस्तित्व हे काही कारणामुळे आहे. कोणास ठाऊक तू एका नवीन सूर्यमालेचा सुर्य असशील."


तारा हरपून गेला. म्हणाला - "मी उगाच असा क्षुल्लक प्रश्न तुला विचारला देवा! तू सर्वशक्तिमान आहेस. धन्यवाद!" आता ताऱ्याच्या प्रत्येक रोमा-रोमात वेगळीच चमक होती.


देव हसला आणि म्हणाला "आपल्या या संभाषणाचे कारण आणि कर्ता देखील मी आहे. पुन्हा हा प्रश्न क्षुल्लक असण्याचा तुलनात्मक विचार का?", असे बोलून देव अंतर्धान पावला.